कोलेस्टेरॉल वाढण्याची कारणे आणि उपचार
कोलेस्टेरॉल हा पिवळ्या रंगाचा एक स्निग्ध पदार्थ असून तो शरीरात आवश्यक असा महत्वाचा घटक आहे. पण आवश्यक असला तरी, त्यामुळे हृदयरोग होतो म्हणून, कोलेस्टेरॉल हा कुप्रसिद्ध आहे. जशी आपल्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट ही योग्य प्रमाणात असली तरच आयुष्य चांगले वाटते तसेच, शरीराचे सुद्धा आहे. कोलेस्टेरॉलचे रक्तामधील प्रमाण वाढले तर, हृदयरोग, अर्धांगवात किंवा उच्च रक्तदाब होण्याची शक्यता जास्त असते.
प्रत्येक पेशीचे बाह्य आवरण तयार करण्यासाठी कोलेस्टेरॉलची आवश्यकता असते. बाइल या पाचक रसामध्ये कोलेस्टेरॉल हा मुख्य घटक असतो. मज्जातंतूचे बाह्य आवरण कोलेस्टेरॉलचे असते. इन्स्ट्रोजीन आणि अँड्रोजिन या लैंगिक हार्मोन्स मध्ये कोलेस्टेरॉल असते. कोलेस्टेरॉल अनेक महत्वाचे कामे करते. उदाहरदार्थ, स्निग्ध पदार्थ वाहून नेणे, रोग प्रतिकारकशक्ती वाढवणे, लाल पेशींचे संरक्षण करणे, तसेच स्नायूंच्या आवरणांचे संरक्षण करणे इत्यादी. शरीरामध्ये कोलेस्टेरॉल यकृतामध्ये तयार होते परंतु, २० ते ३० टक्के कोलेस्टेरॉल आहारामधून येते. बाइल या पाचक रसामधील कोलेस्टेरॉल अन्नाचे पचन होतांना आहारातील कोलेस्टेरॉल मिसळते म्हणून, पचनानंतर शोषण झालेल्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण ४० ते ५० टक्के असते. जास्त झालेले कोलेस्टेरॉल मल आणि मूत्र यांच्या विसर्जनातून बाहेर जाते.
कोलेस्टेरॉलचे रक्तातील प्रमाण १०० मिली मध्ये १५० ते २०० मि. ग्रॅ. असते. रक्तवाहिन्यांचे काठिण्य असेल तर हे प्रमाण २५० मि. ग्रॅ. पेक्षा जास्त असते.
रक्तामध्ये कोलेस्टेरॉल नेहमी लिपिड या लायपोप्रोटीन सोबत असते. ही लायपो प्रथिने दोन प्रकारची असतात. कमी घनतेची (लो डेन्सिटी) आणि जास्त घनतेची (हाय डेन्सिटी) कमी घनता असलेले लायपो प्रथिन रक्तवाहिन्यांमध्ये साठते म्हणून, ते धोकादायक असते. एकूण कोलेस्टेरॉल मध्ये कमी घनतेच्या लायपो प्रथिनांचे प्रमाण जास्त असेल तर, हृदयरोग होण्याची शक्यता अधिक असते. या उलट जास्त घनतेची लायपोप्रथिने घातक असलेले कमी घनतेचे लायपो प्रथिन रक्ताबाहेर काढण्याचे काम करीत असते म्हणजेच ते हृदयरोग टाळण्याचे काम करते.
इ. स. १७६९ पासून कोलेस्टेरॉल वाढण्याच्या कारणे यावर व्यापक संशोधन चालू आहे. पोल्यूटीर डी ला साले या फ्रेंच रसायन शास्त्रज्ञाने साबणासारखा दिसणारा हा पिवळा पदार्थ प्रथम शोधून काढला. अमेरिकेतील नॅशनल हार्ट अँड लंग्स इन्स्टिट्यूटने केलेले संशोधन वर्षांपूर्वीच प्रसिद्ध झाले आहे. त्यामध्ये असे सांगितले आहे की, रक्तामधील कोलेस्टेरॉलच्या प्रमाणाचा हृदयरोगाशी सरळ संबंध असतो. आणि रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी केले तर, हृदयरोग होण्याची शक्यता कमी असते. कोलेस्टेरॉलचे रक्तातील प्रमाण एक टक्क्याने घटले तर हृदयरोग होण्याची शक्यता दोन टक्यांनी घटते.
कोलेस्टेरॉल वाढण्याची कारणे
जेव्हा तुमच्या रक्तामध्ये कोलेस्टेरॉल नावाचा स्निग्ध रेणू जास्त प्रमाणात असतो तेव्हा हाय कोलेस्टेरॉल ही आरोग्य समस्या उद्भवते.
तुमच्या कुटुंबात जर कोणाला उच्च कोलेस्टेरॉलचा त्रास असेल तर, तुम्हाला नक्कीच तुमच्या प्रकृती बाबत चिंता करावी लागेल. कारण, हा एक आनुवंशिक आजार आहे. कोलेस्टेरॉल वाढण्याच्या कारणाने ब्लॉकेज आणि स्ट्रोकचा धोका संभवू शकतो. त्यामुळे घरात कोणाला ही हा आजार असेल तर, तुम्ही तुमच्या प्रकृतीकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
तळलेले पदार्थ जास्त खाणे, दूध जास्त प्रमाणात घेणे, तूप, लोणी, साय जास्त खाणे, मैदा, साखर, केक, बिस्किटे, चीज, आइस्क्रीम, तसेच मांसाहार, मासे, अंडी इत्यादी पदार्थ जास्त खाणे यांमुळे कोलेस्टेरॉल वाढते. दारू आणि धूम्रपान यामुळे ही कोलेस्टेरॉल वाढते.
कोलेस्टेरॉल वाढण्याची कारणे म्हणजे मानसिक तणाव. यामध्ये ऍड्रिनलिन आणि कोर्टिसोन हार्मोन्स चे प्रमाण वाढते. त्यामुळे स्निग्ध पदार्थाची चयापचयाची क्रिया वाढते. उच्च पदावरची माणसे आक्रमक असतात. त्यांच्या ऍड्रिनल ग्रंथी जास्त प्रमाणात हार्मोन्स तयार करतात. त्यामुळे असा माणसांमध्ये हृदयरोग होण्याची शक्यता सामान्य माणसांपेक्षा सहा ते आठ पटींनी जास्त असते.
मायक्रोव्हेव मध्ये भाजलेल्या अन्नामुळे थोड्या फार प्रमाणात कोलेस्ट्रेरॉल वाढते, मायक्रोव्हेव मध्ये बनवलेल्या वेगवेगळ्या पदार्थामुळे कोलेस्ट्रेरॉल वाढवायचे प्रमाण वेगवेगळे आहे. पॉपकॉर्न व कुकीज जास्त प्रमाणात कोलेस्ट्रेरॉल वाढवतात.
शिवाय यकृताचे काही आजार कोलेस्ट्रेरॉल वाढवत असतात कारण, कोलेस्ट्रेरॉल इतर चरबी सारखे व्यायाम करून जळत नाही पण व्यायाम केल्याने एच डी एल हे चांगले कोलेस्ट्रेरॉल वाढते व ते एच डी एल वाईट कोलेस्ट्रेरॉल घेऊन यकृतात जाते व यकृत त्या वाईट कोलेस्ट्रेरॉल चे पित्तात रूपांतर करून पित्ताशयात साठवते जे पित्त अन्न पचन करण्यासाठी उपयोगी पडते.
शरीराचे वजन खूप जास्त असणे व व्यायामाचा अभाव असणे हे ही ही कोलेस्ट्रेरॉल वाढण्याची कारणे आहे.
उपचार
रक्तामधील कमी घनतेची लायपोप्रथिने कमी करणे आणि जास्त घनतेची लायपोप्रथिने वाढवणे हा हृदयरोगाची शक्यता कमी करण्याचा एकमेव उपाय आहे. आहार आणि आचार योग्य ठेवल्याने हे साधता येते.
आहार अत्यंत महत्वाचा आहे. ज्यामध्ये कोलेस्टेरॉल आणि न विरघळणारी म्हणजे संपृक्त स्निग्ध पदार्थ आहेत असे पदार्थ आहारातून कमी करावे. अंडी, मांसाहार, चीज, लोणी, सायीसह दूध असे काही ही प्राणिजन्य कोणता ही पदार्थ खाऊ नये. खोबरेल तेल आणि पाम तेल खाऊ नये. कारण यामध्ये संपृक्त स्निग्ध पदार्थ असतात.
मका, सूर्यफूल, सोयाबीन, तिळाचे तेल ही खाल्याने कमी घनतेची लायपोप्रथिने कमी होतात. कारण, या मध्ये बहूअसंपृक्त स्निग्ध पदार्थ असतात. बदाम तेल आणि शेंगदाणा तेल यांमध्ये एकलअसंपृक्त पदार्थ असतात. त्याचा कमी घनतेच्या लायपो प्रथिनांवर काहीही परिणाम होत नाही.
पुरुषाने ३०० ग्रॅम आणि स्त्रियांनी २५० ग्रॅम कोलेस्टेरॉल घ्यावे असे अमेरिकेच्या हृदयरोग संस्थेने सुचवले आहे. आहारामध्ये ३० टक्क्यांपेक्षा जास्त स्निग्ध पदार्थ असू नयेत. ज्यांचे आधीपासून अधिक कोलेस्टेरॉल वाढलेले आहे त्यांनी या पेक्षा ही कमी घ्यावे असे संस्थेने सुचवले आहे. आहारामध्ये तंतुमय पदार्थ अधिक असतील तर, कोलेस्टेरॉल आणि कमी घनतेचे कोलेस्टेरॉल कमी होते. गव्हाचा भरडा, कोंड्यासकट पिठाचे पदार्थ, बार्ली, बटाटे, गाजर, बीट, सलगम व आंबा, पेरू, पालेभाज्या, कोबी, भेंडी यामध्ये तंतुमय पदार्थ असतात. कमी घनतेचे कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी ओट्स सर्वात उत्तम आहे.
लेसिथीन हा सुद्धा फॉस्फोलिपिड युक्त स्निग्ध पदार्थ आहे. पण तो कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करतो. लेसिथीनमुळे प्रमाण पुरेसे असेल तर, रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल साठत नाही. लेसिथिनमुळे बाइल या पाचक रसाचे प्रमाण वाढते. यामुळे पर्यायाने रक्तामधील कोलेस्टेरॉल कमी होते. अंड्यातील पिवळा बलक, वनस्पतीजन्य तेल, कोंड्यासगट धान्ये, सोयाबीन, धोरोष्ण दूध यांमध्ये लेसिथीन भरपूर असते.
गव्हाचा भरड, यीस्ट यांमध्ये व्हिटॅमिन बी६, कोलिन आणि इनॉसिटॉल ही जीवनसत्वे असतात. ती सुद्धा कोलेस्टेरॉल कमी करतात. इ जीवनसत्व रक्तातील लेसिथिन वाढवते व आवश्यक अशा स्निग्ध अम्लांचे ज्वलन होऊ देत नाही. पर्यायाने कोलेस्टेरॉल वाढू देत नाही.
ज्यांचे रक्तातील कोलेस्टेरॉल वाढलेले आहे त्यांनी दिवसातून आठ ते दहा वेळा पाणी प्यायला हवे. त्यामुळे मूत्रपिंड आणि त्वचा यांमधून टाकाऊ पदार्थ बाहेर पडायला मदत होते आणि पर्यायाने कोलेस्टेरॉल सुद्धा बाहेर पडते.
कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आणि अधिक घनतेची लायपो प्रथिने वाढवण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे. व्यायामामुळे रक्ताभिसरण सुधारते. जॉगिंग, भरभर चालणे, पोहणे, सायकल चालवणे, बॅटमिंटन खेळणे हे उत्तम व्यायाम आहेत.
योगासनांमुळे तेलग्रंथींच्या कार्याला चालना मिळते आणि स्नायूंमधील जास्तीचे कोलेस्टेरॉल बाहेर पडायला मदत होते. अर्धमत्सेंद्रासन, शलभासन, पद्मासन, वज्रासन ही आसने कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी चांगली आहेत.
जलचिकत्सा सुद्धा कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. थंड पाण्याचे कटिस्नान रोज दहा मिनिटे दिवसातून दोन वेळा करावे. उच्च रक्तदाबासाठी बाष्पस्नान उपयुक्त आहे. पोटावर मातीचा लेप दिल्याने अन्नाचे पचन चांगले होते. यामुळे यकृताचे कार्य सुधारते. पचन कार्य सुरळीत होते आणि मूत्रपिंड कार्याला चालना मिळते. शिवाय आतड्यांची हालचाल योग्य होऊन मल वित्सर्जन सुलभ होते.
रोज रात्री मेथी दाणे भिजत घालावे आणि सकाळी ब्रश करायच्या आधी हे पाणी प्यावे म्हणजे बॅड कोलेस्टेरॉल कमी होते आणि चांगले कोलेस्टेरॉल मध्ये वाढ होते.