शिवाजी महाराजांचे निबंध

शिवाजी महाराजांचे निबंध आपल्या समोर प्रस्तुत करतांना आम्हाला खूप आनंद वाटत आहे, आणि आम्हाला  आशा आहे की, शिवाजी महाराजांचे निबंध विद्यार्थी/विद्यार्थिनींना खूप महत्वपूर्ण आणि उपयोगी सिद्ध होईल. शिवाजी महाराजांचे निबंध ते मराठीत वाचा- 

“छत्रपती शिवजी महाराज” हे मराठी साम्राज्याचे संस्थापक होते. हे एक असे राजे होते जे जनतेसाठीच जगले व गुलामगिरीच्या जगण्याला नाकारून त्यासाठी लढा दिला. यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी पुण्यातील जुन्नर शहराजवळ असलेल्या शिवनेरी किल्यावर झाला आणि त्यांच्या जन्मदिवस शिवजयंती म्हणून साजरी केली जाते. अशी एक आख्यायिका आहे की, शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई यांनी मुलाच्या जन्मासाठी शिवाई देवीला प्रार्थना केली होते म्हणून, त्यांनी आपल्या मुलाचे नाव शिवाजी ठेवले. महाराजांचे वडील हे विजापूरच्या राजाच्या सेवेत होते म्हणून, बाल शिवाजींची जबाबदारी त्यांच्या मातेवर होती. जिजाबाईंची त्यांना रामायण, भगवदगीता, महाभारतातील गोष्टी सांगितल्या व राजकारणाचे धडे शिकवले आणि त्यांनीच दिलेल्या संस्कारामुळे शिवाजी राजे घडले. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा पुत्र संभाजी महाराज यांचा संयुक्त उल्लेख “शिवशंभू” म्हणून केला जातो. यांच्या कारकिर्दीच्या कालखंडाला शिवकाल असे ही म्हटले जाते. शिस्तबद्ध लष्कर व सुघटित प्रशासनेच्या यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक समर्थशाली आणि एक प्रागतिक राज्य उभे केले. मुघल आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हमले हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र यांनी यशस्वी पणे वापरले. 

स्वराज्य स्थापना :

जेव्हा आदिलशाहने त्यांना पुण्याची जहागिरी दिली होती तेव्हा लहान शिवाजी आणि जिजाबाई या पुण्याला राहायला आल्या तेव्हा पुण्याची फार दुरावस्था झालेली होती. तेव्हा छोटे शिवाजी राजे आणि कारभारी यांच्या हस्ते पुण्याच्या एका शेतात प्रतीकादाखल सोन्याच्या मुलम्याचे नांगर फिरवून जिजाबाईंची दादोजी कोंडदेव यांच्या मदतीने पुण्याची पुनःस्थापना करायला सुरवात केली. शिवाजी महाराज लहानाचे मोठे असतांना आणि मोठे झाल्यानंतर ही प्रत्येक महत्वाच्या प्रसंगी जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन केले. महाराजांच्या त्या आद्यगुरू होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील मावळ्यांनी शिवाजी राज्यांच्या सोबत हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात मोठा सहभाग नोंदवला. सह्याद्रीच्या दोन डोंगररांगेच्या मधल्या खोऱ्याला मावळ आणि खोऱ्यातील सैनिकांना मावळे म्हणतात. 

छत्रपती शिवाजी महाराज सतरा वर्षाचे असतांना इसवी सन १६४७ मध्ये आदिलशहाच्या ताब्यातील तोरणा गड जिंकला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. तोरणागड हे स्वराज्याचे तोरणच ठरले, त्या वर्षी शिवाजी महाराजांनी कोंढाणा आणि पुरंदर हे आदिलशहा कडून जिंकून पुणे प्रांतावर पूर्ण नियंत्रण मिळवले तसेच, मुरुंब देवाचा डोंगर जिंकून त्याची डागडुजी ही करण्यात आली आणि त्याचे नाव त्यांनी राजगड असे ठेवले. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा पुण्याचा कारभार स्वतंत्र पाहू लागले तेव्हा त्यांनी स्वतःची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली ही राजमुद्रा संस्कृत भाषेत होती.         

“प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता ।।
शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।”

ही राजमुद्रा मराठी मध्ये असे सांगते की, ज्या प्रमाणे प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो आणि सर्व विश्वात वंदनीय होतो तशीच शहाजींचा पुत्र शिवाजींची ही मुद्रा त्यांचे लौकिक वाढत जाईल आणि ही राजमुद्रा फक्त लोकांच्या कल्याणासाठी चमकेल. इसवी सन १६४९ मध्ये आदिलशहाने शहाजी राजांना कैदेत टाकले. याच वेळी शिवाजी महाराजांनी अनेक आदिलशाही किल्ले ताब्यात घेतले म्हणून, शिवाजींचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानास रवाना केले. शिवाजी महाराजांसाठी परिस्थिती फारच बिकट होती एकीकडे वडील शहाजीराजे हे कैदीत होते तर, दुसरीकडे फत्तेखानाच्या स्वारीमुळे स्वराज्याला धोका होता. शिवाजी महाराजांनी पुरंदरावर फत्तेखानाचा पराभव केला. बाजी पासलकर सैन्यासकट पळत्या फत्तेखानासोबत सासवड पर्यंत गेले. सासवड मध्ये झालेल्या लढाई मध्ये बाजी पासलकर यांचा मृत्यू झाला. शिवाजी महाराजांनी मोघल बादशाह शहाजान यास त्याच्या दक्खनच्या सुबेदाराकरवी पत्र पाठवून शहाजी राजांसकट त्यांच्या चाकरीत जायची इच्छा प्रकट केली त्याचा परिणाम म्हणून, शहाजानने आदिलशहावर दबाव आणला आणि परिणामी शहाजी राजांची सुटका झाली. 

अफजलखान वध :

शिवाजी महाराजांचे निबंध हे अफजलखानाच्या वधाच्या चर्चेविना पूर्ण होऊ शकत नाही चला तर मग, अफजल खानाच्या वधाची चर्चा करूया.

आदिलशहाच्या ताब्यात असलेले किल्ले जिंकत राहिल्यामुळे इसवी सन १६५९ साली आदिलशहाने दरबारात शिवाजी महाराजांना संपवण्याचा विडा ठेवला. हा विडा दरबारी असलेल्या अफजल खान नावाच्या सरदाराने उचलला. मोठ्या सैन्यासह आणि लव्याजम्यासह अफजल खान मोहिमेवर निघाला. अफजल खान वाई जवळ आला व शिवाजी महाराजांनी सध्याच्या महाबळेश्वर असलेल्या प्रतापगडावरून त्यास तोंड देण्याचे ठरवले. तहा ची बोलणी सुरु झाली आणि अंतिम बोलणीसाठी शिवाजी महाराजांनी स्वतः यावे असा अफजल खानाचा आग्रह होता पण शिवाजी राजांच्या वकिलाने अफजल खानाला गळ घालून प्रताप गडावरच भेट घेण्यास बोलावले. भेटीच्या नियमानुसार, दोन्ही पक्षाकडील मोजकीच माणसे भेटतील आणि या दरम्यान सर्व जण निशस्त्र राहण्याचे ठरले. शिवाजी महाराजांना अफजल खानाच्या दगेबाजीची कल्पना असल्याने त्यांनी सावधगिरी म्हणून चिलखत घातले आणि सोबत बिछवा तसेच वाघनखे ठेवली. बिछवा चिलखतामध्ये दडविला होता तर, वाघनखे हाताच्या पंज्याच्या आतमध्ये वळवली असल्याने दिसणारी नव्हती.  

शिवाजी महाराजांसोबत जिवा महाला हा विश्वासू सरदार होता तर, अफजलखाना सोबत सय्यदबंडा हा तत्कालीन प्रख्यात आसा दानपट्टेबाज होता. प्रतापगडावरील एका छावणीत भेट ठरली. भेटीच्या वेळी उंचपुऱ्या बलदंड अफजलखानाने शिवाजी महाराजांना मिठी मारली आणि शिवाजी महाराज्चे प्राण काठाशी आले त्यावेळी अफजलखानाने कटारीचा वार शिवाजी महाराजांवर केला परंतु, चिलखतामुळे शिवाजी महाराज बचावले. अफजल खानाचा दगा पाहून शिवाजी महाराजांनी वाघनखे त्याच्या पोटात घुसवली त्याच बरोबर अफजल खानाची प्राणांतिक आरोळी चहूकडे पसरली. त्याच वेळी सय्यदबंडा ने दान पट्याचा जोरदार वार महाराजांवर केला, जो तत्पर जिवा महाला ने स्वतःवर झेलला आणि महाराजांचे प्राण वाचले आणि यामुळेच “ होता जिवा म्हणून, वाचला शिवा” ही म्हण प्रचलित झाली . आधीपासून ठरलेल्या इशारा प्रमाणे भेटीच्या वेळी तीन तोफांचे बार प्रतापगडावरून काढण्यात आले आणि खानाच्या छावणीच्या जवळपास च्या झाडा-झुडपात दडून बसलेल्या मावळ्यांनी हल्ला करून खानाच्या सैन्याची दाणादाण उडवली. खानाचा मुलगा फाजलखान आणि इतर लपून छपून वाईच्या मुख्य छावणी पर्यंत आले इथे खानाचा जनाना होता ते पाठलागावर असलेल्या नेताजींच्या सैन्यापासून वाचवण्यासाठी खजिना, हत्ती व इतर जड सामान टाकून विजापूरला जनान्यासकट पळाले. शिवाजी महाराजांना जनतेत मिळालेला आदर आणि प्रेम अनेक शतकानंतर आज ही टिकून आहे. त्या मागची त्यांची सहिष्णू वृत्ती फार महत्वाचे कारण आहे. अफजल खानाच्या मृत्यूनंतर त्यांनी त्यांच्या शवाचे अंत्य संस्कार इस्लामी पद्धतीने करून त्याची एक कबर प्रतापगडावर बांधली आणि त्या कबरी च्या कायम देखभालीची व्यवस्था ही केली. अफजल खानाच्या मृत्यू मुळे चिडलेल्या आदिलशहाने त्याचा सेनापती सिद्धी जोहर यास सर्व शक्तीनिशी हल्ला करण्याचा आदेश दिला.  

पावनखिंडीतील लढाई :

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनात इसवी सन १६६० साली झालेले हे आक्रमण स्वराज्यावरील अनेक मोठ्या संकटांपैकी एक समजले जाते. त्या सुमारास शिवाजी राजे हे मिरजेच्या किल्याला वेढा घालून होते सिद्धीच्या आक्रमणाची खबर येताच राजे पन्हाळगडावर गेले आणि सिद्धी जोहर ला त्याचा सुगावा लागतच त्याने गडालाच वेढा घातला आणि गडाची रसद तोडली. काही दिवस गडावरील सर्वांनी तग धरली परंतु, सिद्धीचा वेढा उठवण्याचे काही लक्षण दिसेना तेव्हा सर्वांशी खलबत करून शिवाजी राज्यांनी जवळच्या विशाल गडावर पोहचावे असा निर्णय घेतला शिवा काशिद हे शिवाजी महाराजांच्या सैन्यात न्हावी होते हे शिवा काशिद हुबेहूब शिवाजी महाराजांसारखे दिसत असत यांना पोशाख ही शिवाजी महाराजांसारखा दिला होता त्यामुळे सिद्धी जोहरच्या सैनिकांनी पालखीत बसलेल्या आणि पळून जाणाच्या प्रयत्नात असलेल्या शिवा काशिदांना शिवाजी राजे असे समजून  पकडले आणि सिद्धीकडे नेले मात्र हे शिवाजी नाहीत असे कळताच जोहर ने त्यांच्या पोटात तलवार खुपसली. शिवाजी राजे आणि काही मंडळी गुप्त रस्त्याने शिताफीने निसटले. याचा पत्ता लागताच सिद्धी जोहरने सिद्धी मसूद च्या बरोबर काही सैन्य पाठलागावर रवाना केले. पन्हाळगडा पासून काही अंतरावर वाटेत सिद्धीच्या सैन्याने त्यांना घोडखिंडीत गाठले आणि हातगाई ची लढाई सुरु केली तेव्हा शिवाजी महाराजांचे विश्वासू पराक्रमी सरदार बाजीप्रभू देशपांडे यांनी शिवाजी राजांना विनंती केली की, त्यांनी विशाल गडाची पुढे कूच करावे आणि खिंडीतील लढाई स्वतः लढतील. राजे विशाल गडावर पोहचताच तोफांच्या तीन डागण्या ऐकू आल्या पाहिजे म्हणजे, शिवाजी महाराज सुखरूप गडावर पोहचले असा संदेश मिळेल. बाजीप्रभू देशपांडे यांनी वचन दिले जोपर्यंत तोफांचे तीन आवाज ऐकू येणार नाही तोपर्यंत सिद्धी जोहर ला खिंडीमध्ये च झुंझवत ठेवतील. शिवाजी राज्यांना ते पटेना पण बाजींच्या विनंती वजा हट्टापुढे त्यांनी यास मान्यता दिली आणि विशाल गडासाठी कूच केले. बाजींनी सिद्धीच्या सैन्याला थांबवून ठेवण्यासाठी प्राणांची आहुती लावली होती परंतु, सिद्धीच्या अधिक सैन्यापुढे ते घायाळ झाले होते आणि जेव्हा शिवाजी महाराज गडावर पोहचले आणि त्या तोफांचा आवाज त्यांनी ऐकलं तेव्हा बाजीप्रभूंनी त्यांचे प्राण सोडले. शिवा काशिद आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या मृत्यूची बातमी महाराजांना खूप चटका देऊन गेली. बाजीप्रभू हे ज्या घोडखिंडीत लढले त्याचे नाव “पावनखिंड” देण्यात आले. बाजीप्रभूच्या बलिदानाने पावन झालेली ती “पावनखिंड” 

“लाख मेले तरी चालतील पण, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे” – श्री बाजी प्रभू देशपांडे      

शाहिस्तेखान पळाला : 

मुघल साम्राज्याचा नर्मदा नदी पलीकडे विस्तार तसे, शिवाजी महाराजांच्या राज विस्ताराला व्यसन घालणे ह्या दोन हेतूंसाठी औरंगजेबाने त्याचा मामा शाहिस्तेखान याला दक्खनच्या मोहिमेवर पाठवले. प्रचंड मोठा लवाजमा, सैन्य आणि फौज सोबत घेऊन शाहिस्तेखान निघाला आणि वाटेत असलेल्या प्रत्येक राज्यातील गावात त्याने दहशत पसरवली आणि जितके जमले तितका विद्वंस केला. शेवटी पुण्याजवळील चाकण चा किल्ला जिंकून पुण्यातील चाकण चा किल्ला जिंकून पुण्यातील शिवाजी महाराजांच्या लाल महालात तळ ठेवला. शिवाजी महाराजांनी खानाचा बंदोबस्त करण्यासाठी एक धाडसी निर्णय घेतला तो म्हणजे, लाल महालात शिरून खानाला संपवण्याचा!  

लाल महालात अवती-भोवती खडा पहारा असे तेव्हा महालात शिरणे अतिशय जोखीमीचे काम होते. एके रात्री लाल महाला जवळून जाणाऱ्या एका लग्नाच्या मिरवणुकीचा आधार घेऊन काही मोजक्या माणसांसह स्वतः शिवाजी महाराज लाल महालात शिरले. महालाचा काना-कोपरा माहित असल्याने लवकरच प्रत्यक्ष शाहिस्तेखानाच्या खोलीत शिवाजी महाराजांनी प्रवेश केला तो पर्यंत महालात कुठेतरी झटापट सुरु झाल्यामुळे शाहिस्तेखानाला जाग आली आणि समोर शिवाजी महाराजांना पाहून आणि आपला जीव वाचवण्यासाठी त्यांने खिडकीतून उडी घेतली. शिवाजी महाराजांनी चपळाईने केलेला वार हुकल्यामुळे त्याची तीन बोटे कापली गेली. यामुळे मुघल साम्राज्याची नाच्चकी झाली ती स्वराज्यासाठी अधिकच फायद्याची ठरली. जे राजे मोघलांच्या आश्रयामुळे शिवाजी महाराजांना जुमानत नसत ते आता शिवाजी राजांच्या पराक्रमामुळे त्यांच्या बाजूने झुकले.

मित्रांनो, शिवाजी महाराजांचे निबंध मध्ये आपण शिवाजी महाराजांच्या विशेष पराक्रमाच्या कथा ऐकून आपल्याला प्रेरणा मिळते.  

सुरतेची पहिली लूट:

इसवी सन १६६४ सततची युद्धे आणि त्यामुळे रिता होत असलेला खजिना यामुळे शिवाजी राजे चिंतीत असत. मुघलांना किंवा इतर सुलतांनांना ही चिंता फार सतावत नसे. अन्याय कर लादून किंवा बळजबरीने खंडणी जनतेकडून वसूल करण्यात बादशाही कारभारास कमी पणा वाटत नव्हता. अनेक दिवसांच्या खलबत्यानंतर शिवाजी महाराजांनी शेवटी एक उपाय शोधून काढला तो म्हणजे इतिहासातील माहिती असलेली सुरतेची पहिली लूट. 

आजच्या गुजरात राज्यातील सुरत शहर हे तत्कालीन मुघल राज्यात होते आणि व्यापारामुळे अतिशय श्रीमंत शहरांपैकी एक होते. सुरत शहराच्या लुटीमुळे दोन गोष्टी सध्या करता आल्या एक म्हणजे मुघल सत्तेला आवाहन आणि राज्याच्या खजिन्यात भर. लुटूचा इतिहास भारतात अतिशय रक्तरंजित आणि विनाशक आहे. त्या पार्श्वभूमीवर सुरतेची लूट पूर्णपणे वेगळी जाणवते. शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार, स्रिया, मुले आणि वृद्ध यांच्या केसाला ही धक्का न लावता ही लूट केली गेली. मस्जिद, चर्च या सारख्या देवस्थानांना ही लुटीतून संरक्षण दिले गेले. शाहिस्तेखानाचा पराभव, सुरतेची लूट, जसवंतसिंगच्या पराभवाने औरंगजेबाचा संताप वाढत होता. सत्तर हजारांची फौज घेऊन शाहिस्तेखान गेला व बोटे गमावून माघारी आला. दिल्ली सम्राटांची व्यापार पेठ सुरतहून बघता बघता लुटली गेली.

आग्राहून सुटका:

शिवाजींचा असाच उद्योग चालू राहिला तर, मुघलाई संपुष्ठात आल्याखेरीस राहणार नाही हे औरंगजेबाने ओळखले. शिवाजींचे पारिपत्य करण्यासाठी त्यांने आपल्या दरबाराचा सर्वश्रेष्ठ सरदार निवडला. मिर्झारा जयसिंग ८० हजार स्वार बरोबरी दिलेर खान ५००० पठाण घेऊन शिवाजींचे पारिपत्य करण्यासाठी निघाला. मिर्झा राजांनी पुरंदरला वेढा घालता. दिलेर खानाने वज्रगडाचा ताबा घेतला. वज्रगडावरून पुरंदरावर तोफ्यांचा मार सुरु करण्यात आला. तोफ्यांच्या हल्ल्याने पुरंदरच्या खिंडार पडले. मुघल फौजेने किल्ल्यात प्रवेश केला माचीवर खानाचे आणि मुरार बाजीचे घनघोर युद्ध झाले. मुरारबाजी पडला त्याच बरोबर पुरंदर ही पडला. हे वर्तमान जेव्हा राज्यांना कळले तेव्हा त्यांनी जयसिंगाशी तहा ची बोलणी सुरु केली आणि ११ जून १६६५ साली इतिहास प्रसिद्ध पुरंदरचा तह झाला. कोंढाणा,किल्ले पुरंदर, लोहगड, पळसगड या सारखे एकूण तेवीस किल्ले राजांना मुघलांना द्वावे लागले. इसवी सन १६६६ साली औरंगजेबाने शिवाजी महाराजांना दिल्ली येथे भेटीसाठी आणि विजापूरवर त्यांनी केलेल्या आक्रमणावर चर्चा करण्यासाठी बोलावले त्या नुसार शिवाजी राजे दिल्ली ला पोहचले त्यांच्या सोबत नऊ वर्षाचा संभाजी देखील होता परंतु, दरबारात त्यांना कनिष्ठ सरदारांच्या समवेत उभे करून शिवाजींसारख्या राज्यांचा उपवर्ध केला. या अपमानामुळे शिवाजी महाराज तडप दरभारा बाहेर पडले असता त्यांना त्याच क्षणी अटक करून नजरकैदेत ठेवण्यात आले. शिवाजीं बद्दल अधिक धास्ती असल्याने त्यांच्यावर कडक पहारा ठेवला होता. काही दिवस निघून गेले आणि सुटकेपासून प्रयत्न फोल ठरले होते. शेवटी शिवाजी महाराजांनी एक योजना आखली त्या योजनेनुसार त्यांनी आजारी पडल्याचे निमित्त केले आणि त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी विविध मंदिरांना आणि दर्ग्यांना मिठाईचे पेटारे पाठवायला देऊ लागले. सुरवातीला पहारेकरी प्रत्येक पेटारा बारकाईने तपासून पाहत परंतु, काही दिवसांनी यात ढिलाई होऊ लागली नंतर त्यांनी तपासण्याचे देखील सोडून दिले याच संधीचा फायदा घेऊन एक दिवस शिवाजी महाराज आणि संभाजी एक एक पेटाऱ्यात बसून निसटण्यास यशस्वी झाले. कोणास संशय येऊ नये म्हणून, शिवाजी राजांचा विश्वासू हिरोजी फर्जत हा शिवरायांचे कपडे चढवून आणि त्यांची अंगठी दिसेल अश्या पद्धतीने हात बाहेर काढून झोपण्याचे नाटक करत होता. शिवाजी महाराज दूरवर पोहचल्याची खात्री आपल्यानंतर तो देखील पहारेऱ्यांना बगल देऊन निसटला. बराच वेळ काही ही हालचाल होत नसतांनाचे पाहून पाहरेकरे आत गेले त्यांना तिथे कुणीच आढळले नाही तेव्हा त्यांना सत्य परिस्थिती समजली तो पर्यंत शिवाजी महाराज निसटून चोवीस तास झाले होते. आग्रा येथून शिवाजी महाराजांनी वेषांतर केले आणि लगोलग स्वराज्याकडे न जात मथुरेकडे गेले त्यांनी तेथे जाऊन संभाजीला काही वेगवेगळ्या मार्गाने काही दुसऱ्या विश्वासू माणसांसोबत पाठवले. एका संन्यासाच्या वेशात महाराष्ट्रात प्रवेश केला त्यात देखील त्यांना अनेक खबरदऱ्या घ्याव्या लागल्या. ते अतिशय लांबच्या, तिरकस, वाकड्या मार्गाने दरमजल करत आले. उद्देश असा होता की, काही झाले तरी आता परत औरंगजेबाच्या हातात पडायचे नाही. 

यात अजून एक गोष्ट उल्लेखनीय आहे की, दिल्ली भेटीपूर्वी त्यांनी राज्यकारभारासाठी जे अष्ट प्रदान स्थापले होते त्या अष्ट प्रदान मंडळाने राजाच्या अनुपस्थितीत देखील राज्याचा कारभार चोख चालवला होता. हे शिवाजी राज्यांचे आणि अष्ट प्रदान मंडळाचे फार मोठे यश आहे. शिवाजी राजे परतल्यानंतर त्यांनी झालेल्या अपमानाचा सूड घेण्यासाठी पुरंदरच्या तहात गेलेले सर्व तेवीस किल्ले जिंकून घेतले. त्यांनी त्यातील पहिले कोंढाणा घ्यायचे ठरवले. तान्हाजी मालुसरे यांनी आपल्या मुलाच्या लग्नाची तयारी अर्धवट सोडून राज्यासाठीचे आपले काम प्राधान्य देऊन जबरदस्त चौक्या पहारे व अतिशय कडेकोट बंदोबस्त असलेला आणि उदयभान सारखा पराक्रमी किल्लेदार असलेला कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्याचा विडा उचलला. ते कोंढाणा जिंकण्यासाठी आपल्या तुकडी बरोबर निघाले. “आधी लगीन कोंढाण्याचे, मग लगीन रायबाचे” हे त्यांचे शब्द इतिहासात अजरामर आहेत. कोंडाण्याचा लढायची सुभेदार तान्हाजी मालुसरे यांना लढतांना वीरमरण आले. 

राज्याभिषेक वेळी सिंहासनावर जातांना पावलो पावली शिवाजी महाराजांना आपल्यासाठी बलिदान दिलेल्या बाजीप्रभू देशपांडे, तान्हाजी मालुसरे, शिवा काशिद अश्या अनेक सेनापतींची आणि मावळ्यांचे आठवण येत होती आणि त्यांना अश्रू अनावर झाले. ६ जून इसवी सन १६७४ रोजी शिवाजी राज्यांना रायगडावर राज्याभिषेक करण्यात आला. त्या दिवसापासून शिवाजी राज्यांनी शिवराज्याभिशेक शक सुरु केला आणि शिवराई हे चलन जारी केले या शिवाय, नवी कालगणना सुरु होऊन नवा शक सुरु झाला. फारसी, संस्कृत शब्दकोश बनवला गेला या जागी फारशी च्या ऐवजी संस्कृत शब्द वापरणे हे हुकूम जारी केले. तसेच पंचांग शुद्धी करण्याची सक्ती केली. यासाठी कृष्ण दैवक नामक ज्योतिषी बोलावला. या ज्योतिषाने ग्रंथ लेखन करावे आणि संबंधितांना रीत घालून द्यावी असा आदेश दिला तसेच, त्यांच्या कडून करण कौस्तुभ नामक ग्रंथ ही लिहून घेतला. भोसले कुटुंबातील या सुपुत्राने विजापूरच्या आदिलशाही विरुद्ध आणि मोघलाई विरुद्ध ऐतिहासिक संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा साम्राज्य शिवाजी महाराजांनी उभे केले या जनतेच्या राज्याला कोटी कोटी प्रणाम! 

जगदंब!                 

आम्हाला अपेक्षा आहे की, शिवाजी महाराजांचे निबंध तुम्हाला नक्कीच आवडेल. जर आपल्याला वाटते की, शिवाजी महाराजांच्या जीवनातील काही महत्वाचा पैलू आमच्याकडून सुटला असेल तर कृपया आम्हाला कमेंट करून कळवा आम्ही त्याला नक्कीच लेखात नक्कीच भर करू. 

Leave a Reply